Tuesday, May 8, 2007

आजच्या इ-सकाळची 'गं'मत चाचणी!


मोब्लॉबिंग हा एसएमएसला पर्याय ठरेल, असे वाटते का?

१. हो
२. नाही
३. माहित नाही

मुळात महाजालावर ब्लॉग लिहिणे आणि एस्एम्एस् करणे या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे?

या दोन्ही कल्पना पुर्णपणे वेगळ्या आहेत. दोन्ही गोष्टींचे मुलभूत उद्देश वेगळे आहेत. एस्एम्एस् केला जातो आपला निरोप फक्त इच्छित व्यक्तीपर्यंत तत्काळ पोचवण्यासाठी तर जालनिशी लिहिली जाते आपले विचार सर्वांपर्यंत कायमस्वरुपी पोचवण्यासाठी किंवा नोंद ठेवण्यासाठी. एस्एम्एस् चे आयुष्य मर्यादित असते. सर्वसाधारणपणे दुसऱ्या व्यक्तीला निरोप मिळाला कि एस्एम्एस् चे अस्तित्व संपुष्टात येते. तर आपले जालनिशीवरचे लेख नेहमीच उपलब्ध रहावेत अशी लिहिणाऱ्याची इच्छा असते.

इलेक्ट्रॉनिक्स, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीमुळे एखादे उपकरण दुसऱ्याला जोडणे, एका उपकरणाकडून माहिती घेऊन दुसऱ्याला देणे तितकेसे अवघड राहिलेले नाही. जालनिशी तुम्ही संगणकाचा दृश्यफलक व कळफलक वापरुन लिहा किंवा मोबाईलचा दृश्यफलक व कळफलक वापरुन लिहा, अर्थ एकच. एखादी गोष्ट करण्यासाठी मार्ग कुठलाही वापरा, हवा तो परिणाम साध्य झाला म्हणजे झाले.

मोबाईल वरुन एस्एम्एस् करणे किंवा संगणकाचा वापर करुन याहू किंवा तत्सम मेसेंजर वरुन एस्एम्एस् करणे यातही तसाच काहीही फरक नाही. मार्ग दोन परिणाम एक.

सकाळच्या कोणा नव/उप/कार्यकारी/सहसंपादकाला हि कल्पना सुचली ते मुख्यसंपादकच जाणोत. आश्चर्याची गोष्ट अशी की इ-सकाळच्या वाचक वर्गापैकी ४०% पेक्षा जास्त वाचकांना मोब्लॉगिंग हा एस्एम्एस् ला पर्याय वाटतो!!!




तुम्हाला काय वाटतं?

Monday, May 7, 2007

लिनक्स व मराठी - Marathi on Linux

'विंडोज' या प्रणालीवर बराहा लोकप्रिय आहे. बराहा IME बद्दल अधिक माहिती इथे मिळेल. विंडोजवर बराहा वापरुन मराठीत(देवनागरीत) कसे लिहावे याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. गुगल या शोधयंत्राचा वापर केल्यास अजून माहिती मिळू शकेल.

लिनक्स या नितांतसुंदर मुक्तस्रोत प्रणालीवर मराठीचा वापर कसा करावा याबद्दल मात्र फार माहिती उपलब्ध नाही. लिनक्सवर मराठी वापरणे विंडोजपेक्षा जास्त सोपे आहे. तसेच लिनक्सवर मराठीचा वापर फार पुर्वीपासून सुरु आहे.

लिनक्सवर देवनागरीचा वापर करण्यासाठी 'स्किम' - SCIM : Smart Common Input Method हि आज्ञावली वापरली जाते. SCIM मध्ये मराठी लिहिण्यासाठी 'inscript', 'itrans' व 'phonetic' असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व पद्धती वापरून 'युनिकोड' प्रकारचे लेखन करता येते.

SCIM चे बराहाशी साधर्म्य आहे. (खरेतर बराहाचे SCIM शी साधर्म्य आहे.) बराहामध्ये itrans ही पद्धत वापरली जात असल्याने बराहा वापरणाऱ्यांना SCIM itrans वापरणे फारच सोपे आहे.

SCIM आपण http://www.scim-im.org/downloads येथून डाऊनलोड करू शकता. लिनक्सवर इंस्टॉल करण्याच्या पद्धतीप्रमाणे make, make install करुन इंस्टॉलेशन करावे.

श्री. अविनाश चोपडे यांनी itrans हि पद्धत २००१ च्या आसपास विकसित केली. संगणकावर भारतीय भाषांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी काम करणारे अविनाश कौतुकास पात्र आहेत. आज आपण संगणकावर मराठी वापरू शकतो याचे फार मोठे श्रेय त्यांना जाते. संगणकावर भारतीय भाषा वापरणारे आपण सर्वजण त्यांचे ॠणी आहोत.

अधिक माहितीसाठी:
http://en.wikipedia.org/wiki/ITRANS
http://en.wikipedia.org/wiki/SCIM
http://www.aczoom.com/itrans/
http://www.scim-im.org/


----------------------------------


SCIM itrans वापरण्यासाठी तक्ते खालीलप्रमाणे.

बाराखडी

अंअः
aaa/Aiii/Iuuu/UeaioauaMaH
काकिकीकुकूकेकैकोकौकंकः
kakaakikiikukuukekaikokaukaMkaH


वर्णमाला


kakhagagha~Na
chachhajajha~na
TaThaDaDhaNa
tathadadhana
paphababhama
yaralavasha
क्षज्ञ
ShasahaLaxa/kShaj~na


एक चिन्हीय जोडाक्षरांची उदाहरणे

द्यद्दत्रश्र
dyaddatrashraR^iR^IL^iOM/AUM



अनुस्वार.n/M
चंद्रबिंदु.N
अर्धचंद्र.c
विसर्गH
दंड..
अर्धा र्
rh
अवग्रह.a


आकडे

1234567890


काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी:

वार्ता --------------> vaartaa
वाऱ्यावर ------------> vaarhyaavara
बॅट ---------------> b.cTa

Saturday, May 5, 2007

लकी

कर्वे रोड, लकडीपुलावरुन डेक्कनवर जाण्यासाठी गरवारेंचा पिटुकला उड्डाणपूल पार केला की जेमतेम पन्नास पावलं गेल्यावर लागतं 'लकी'. जागा अशी की एका बाजूला हाँगकाँग लेन, दुसऱ्या बाजूला चँपिअन स्पोर्टस्. मागच्या बाजूला डेक्कन टॉकिज. हे इराण्याचं होटेल आपलं आवडीचं ठिकाण.

प्रशस्त दरवाजा. त्यावरच्या छज्जावर लाल अक्षरात ' L U C K Y' लिहिलेलं. आत गेलं की समोरच देव आनंदचं मोठ्ठं पोस्टर. बऱ्याच वर्षांपुर्वींच्या ह्या जुन्या पोस्टरने लकीचं देव आनंदशी असणारं नातं टिकवलेलं. काऊंटरही बहुधा त्याच काळातलं असावं. सततच्या वापराने आपोआप पॉलिश झालेल्या जुन्या लाकडाचं. त्यावर एक जाड काच - तीही त्याच काळातली, वरच्या असंख्य चऱ्यांमुळे थोडी धुसर झालेली. त्या काचेखाली अजून काही फोटो. काऊंटरच्या मागची कपाटेही जुनीच. उजव्या बाजूला 'पेशल' भाग आणि डाविकडे फुंक्यांसाठी धुम्रकांडीमुभा क्षेत्र. सगळा सेटअप कसा एकदम कंफर्टेबल करणारा.

हा काही तसा आमचा 'कट्टा' नव्हता पण बऱ्याच वेळा काही काम नसलं की साग्याला फोन लावायचा आणि इथं जाऊन बसायचं. आवडते पदार्थ बन-मस्का आणि इराणी चहा. गप्पा आणि बन-मस्का हाणायला वेळेचं बंधन नाही. चहाबरोबर कधी सामोसाही मागवायचा. बसल्या बसल्या मानस, जहाग्याला फोन लावायचे. तेही मग असतील तिथून दुचाक्या(हिला आम्ही पुण्यात 'गाडी' म्हणतो) हाकत येणार. मग अजून थोडी बकवास करायची. नाटकांचे, चित्रपटांचे, ट्रेकचे प्लॅन करायचे. भविष्याचं प्लॅनिंग करायचं. चर्चा करायच्या, वाद घालायचे. बरंच काही!

रात्रीचा नौ से बारा वाला चित्रपट संपला की आमची गाडी हटकून लकीकडे वळायची. इतक्या रात्री काय करायचं असा प्रश्न नसायचाच. घरी जायच्या आधी एकदा लकीचा चहा घेतला पाहिजेच. नंतर नंतर कधी ई-स्केअरला साडेअकराच्या शो ला गेलो तरी रात्री दिडवाजता भूक लागली की जायचो लकीलाच. रात्री बारानंतर आमच्या सारख्या गिऱ्हाईकांसाठी वेगळा प्रवेशमार्ग असायचा. लकीच्या बाजुच्या जिन्याने वर चढून पहिल्या मजल्यावरुन खाली लकीत उतरायचं. बाहेरचा दरवाजा बंद असला तरी आत आमच्यासाठी लकी चालूच असायचं.

मागच्या वर्षी हे लकी बंद झालं. डेक्कन टॉकिज आणि लकी दोन्ही जमिनदोस्त करुन त्या जागी मॉल बनवण्याचा घाट घातलाय असं ऎकलं. साठच्या दशकापासून अगदी आत्तापर्यंतच्या तरूण पिढीची हक्काची जागा गेली. कित्येक मराठी लेखकांचे, नाटककारांचे, हौशी कलाकारांचे, राजकिय कार्यकर्त्यांचे, महाविद्यालयीन विद्यार्थांचे ऋणानुबंध लकीशी जुळले असतील. आता फक्त आठवणी राहिल्या. विकासासाठी आपल्या भुतकाळाचा दिलेला हा अजुन एक बळी. पुण्यात गेल्यावर आता लकी दिसणार नाही. खंत वाटते की आठवण म्हणून ह्या लकीचा एक फोटोही कधी काढून ठेवला नाही.