
युरोप व अमेरिकेत मात्र हा धाडसी छंद फक्त छंद आहे असं नाही तर त्याला क्रिडाप्रकार म्हणूनही मान्यता आहे. अमेरीकेतील या खेळाचा सम्राट आहे "कृष्णा शर्मा".
पुर्ण नाव - "कृष्णा ओमप्रकाश शर्मा". नाव जरी भारतीय किंवा देसी असलं तरी हा माणूस भारतीय नाही. कॅलिफोर्नियामध्ये सॅन्ताक्रुज या ठिकाणी २३ एप्रिल १९८१ साली धर्मांतरीत हिंदू (हिप्पी?) आई-वडीलांच्या पोटी याचा जन्म झाला. आई गिता जॉन व वडील बॉब शर्मा हे बाबा हरिदास यांचे शिष्य. कृष्णाला त्याचे नाव बाबा हरिदास यांनीच दिले. नंतर त्याचे क्रिस झाले.
कातळारोहण व बोल्डरींग हे जात्याच अवघड क्रिडाप्रकार आहेत. कातळारोहणामध्ये कडा चढत असताना निसर्ग दयामाया दाखवत नाही, खोबणीतला हात किंवा पाय सुटला तर प्राणाशीच गाठ. (त्यामुळे जर हात पाय सुटला तर दरीत पडून मृत्यू ओढवू नये म्हणून फक्त आधारासाठी दोराचा वापर करतात.) अशा या खेळातले क्रिसने नैपुण्य पाहून थक्क व्हायला होतं. इतरांसाठी जे अप्राप्य ते हा माणूस अगदी सहज करून दाखवतो. त्याचे आरोहण पहाताना ते इतकं अवघड असेल असं वाटतंच नाही, पण ज्यांनी कोणी थोडंफार कातळारोहण केलंय त्यांना क्रिस जे करतो ते किती अवघड आहे याची कल्पना येईल. अंगी काहीतरी दैवी गुण असल्याशिवाय असं करणे अशक्यच आहे. एखाद्या बॅलेडान्सर सारख्या त्याच्या हालचाली असतात. त्याच्या हातात, बोटांत असणाऱ्या कमालीच्या ताकदीच्या व लवचिकपणाच्या जोरावर त्याने अवघडात अवघड केवळ स्वप्नवत अशा वाटांनी प्रस्तरारोहण केले आहे.
२००१ मध्ये क्रिसने रियलायझेशन या मार्गाने चढाई करून खळबळ उडवून दिली होती. 'Realization' हा मार्ग जाणकारांच्या मते 5.15a या श्रेणीचा आहे. अर्थात यातही वेगवेगळे प्रवाद, मते आहेतच. मानवी आरोहणाची परमोच्च मर्यादा म्हणजे ही शेवटची श्रेणी. मुळात एखाद्या प्रस्तराचा अवघडपणा मोजणे ही काही फुटपट्टी लावून अंतर मोजण्याइतकी सोपी गोष्ट नाही. क्रिस स्वत: या श्रेणी ठरविण्याच्या नादी लागत नाही. तो त्याचे काम करून मोकळा होतो. तो जे करतो ते मात्र अचाट, अतर्क्य असते. या व्हिडीओमधील 'रिअलायझेशन' पहा.