Monday, March 31, 2008

कृष्णा ओमप्रकाश शर्मा - Chris Sharma

आपल्यासारख्या राकट कणखर दगडांच्या देशातल्या लोकांसाठी डोंगर, पर्वत, कडे-कपाऱ्या खरंतर काही नवीन नाहीत. सह्याद्रीत पदभ्रमण(Trekking) करणे, गडकिल्ल्यांच्या वाऱ्या करणे हे तर आपल्याकडचे आवडते छंद. हरीश कपाडिया, आनंद पाळंदे, निनाद बेडेकर यांनी अनेक पुस्तके लिहून त्यात मोलाची भर घातली आहे. डोंगरयात्रा, साद सह्याद्रीची - भटकंती किल्ल्यांची, आव्हान ही पुस्तके केवळ अप्रतीम. ट्रेकर्ससाठी भगवद् गीताच या. पदभ्रमणाबरोबरच प्राणी/पक्षी निरीक्षण, निसर्ग निरीक्षण व संवर्धन, छायाचित्रण वगैरे उपछंद ही बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. पण त्यामानाने कातळारोहण किंवा प्रस्तरारोहण(Rock Climbing) हा तसा दुर्लक्षित छंद. बोल्डरींग(Bouldering) यासाठी तर मराठी प्रतिशब्द अजून तयार व्हायचा असावा.

युरोप व अमेरिकेत मात्र हा धाडसी छंद फक्त छंद आहे असं नाही तर त्याला क्रिडाप्रकार म्हणूनही मान्यता आहे. अमेरीकेतील या खेळाचा सम्राट आहे "कृष्णा शर्मा".

पुर्ण नाव - "कृष्णा ओमप्रकाश शर्मा". नाव जरी भारतीय किंवा देसी असलं तरी हा माणूस भारतीय नाही. कॅलिफोर्नियामध्ये सॅन्ताक्रुज या ठिकाणी २३ एप्रिल १९८१ साली धर्मांतरीत हिंदू (हिप्पी?) आई-वडीलांच्या पोटी याचा जन्म झाला. आई गिता जॉन व वडील बॉब शर्मा हे बाबा हरिदास यांचे शिष्य. कृष्णाला त्याचे नाव बाबा हरिदास यांनीच दिले. नंतर त्याचे क्रिस झाले.

कातळारोहण व बोल्डरींग हे जात्याच अवघड क्रिडाप्रकार आहेत. कातळारोहणामध्ये कडा चढत असताना निसर्ग दयामाया दाखवत नाही, खोबणीतला हात किंवा पाय सुटला तर प्राणाशीच गाठ. (त्यामुळे जर हात पाय सुटला तर दरीत पडून मृत्यू ओढवू नये म्हणून फक्त आधारासाठी दोराचा वापर करतात.) अशा या खेळातले क्रिसने नैपुण्य पाहून थक्क व्हायला होतं. इतरांसाठी जे अप्राप्य ते हा माणूस अगदी सहज करून दाखवतो. त्याचे आरोहण पहाताना ते इतकं अवघड असेल असं वाटतंच नाही, पण ज्यांनी कोणी थोडंफार कातळारोहण केलंय त्यांना क्रिस जे करतो ते किती अवघड आहे याची कल्पना येईल. अंगी काहीतरी दैवी गुण असल्याशिवाय असं करणे अशक्यच आहे. एखाद्या बॅलेडान्सर सारख्या त्याच्या हालचाली असतात. त्याच्या हातात, बोटांत असणाऱ्या कमालीच्या ताकदीच्या व लवचिकपणाच्या जोरावर त्याने अवघडात अवघड केवळ स्वप्नवत अशा वाटांनी प्रस्तरारोहण केले आहे.

२००१ मध्ये क्रिसने रियलायझेशन या मार्गाने चढाई करून खळबळ उडवून दिली होती. 'Realization' हा मार्ग जाणकारांच्या मते 5.15a या श्रेणीचा आहे. अर्थात यातही वेगवेगळे प्रवाद, मते आहेतच. मानवी आरोहणाची परमोच्च मर्यादा म्हणजे ही शेवटची श्रेणी. मुळात एखाद्या प्रस्तराचा अवघडपणा मोजणे ही काही फुटपट्टी लावून अंतर मोजण्याइतकी सोपी गोष्ट नाही. क्रिस स्वत: या श्रेणी ठरविण्याच्या नादी लागत नाही. तो त्याचे काम करून मोकळा होतो. तो जे करतो ते मात्र अचाट, अतर्क्य असते. या व्हिडीओमधील 'रिअलायझेशन' पहा.



क्रिस त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या ध्यानधारणेला व त्यामधून मिळालेल्या मानसिक ताकदीला देतो. त्याच्या मते एखादे प्रस्तरारोहण हे फक्त शारीरीक ताकदीवर अवलंबून नसते, त्यासाठी मानसिक ताकदीचीही तितकीच किंवा जास्तच गरज असते. रियलायझेशन बाबत तो म्हणतो की मी मनाने खंबीर असल्यानेच हे करू शकलो, त्यामानाने शरीराची ताकद फार नाही लागली!!!. अशा वेळेला मन शांत ठेवणे गरजेचे असते, सततच्या अपयशाने खचून न जाता, निराश न होता, एकदा नाही जमलं तर दुसऱ्यांदा नाहीतर तिसऱ्यांदा, चौथ्यांदा. . . . . पण प्रयत्न सोडायचे नाहीत, मनाची ताकदच तुम्हाला त्यातून पुढे घेऊन जाते. विजिगिषु वृत्ती म्हणजे हीच. क्रिस त्याचे मुर्तिमंत उदाहरण.

प्रस्तरारोहणाचा दुसरा प्रकार म्हणजे बोल्डरींग. यात १५-२० फुटांपर्यंतच्या मोठमोठ्या धोंड्यांवर चढाई करायची असते. यात जरी मरणाचा धोका नसला किंवा कमी असला तरी यात मुक्त चढाई करायला जास्त वाव असतो. यातही क्रिसचे कौशल्य वादातीत अफाट आहे. संपुर्ण शरीराचे वजन हाताच्या बोटांच्या टोकावर तोलून केलेल्या ह्या चढाया पहा.

chris sharma climbing witness the fitness