त्यावर मी एक साधी सोपी युक्ती वापरतो. काय करायचं की -
१. आपल्याला जो लेख लिहायचा आहे तो आधी पूर्ण लिहायचा.
२. मग त्यात जे शब्द चुकीचे लिहिले गेले आहेत असं वाटत असेल ते शब्द वेगळे काढायचे.
३. मग एक एक करून गुगलवर(www.google.com) प्रत्येक शब्द शोधायचा व तो शब्द कितीवेळा गुगलला आढळला ते पहायचं उदा. वरच्या वाक्यातून 'चुकीचे' हा शब्द घेऊ.
४. मग तोच शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहून गुगलवर शोधायचा. उदा. 'चुकिचे', 'चूकिचे', 'चूकीचे', 'चुकीचे' वगैरे. यातले बरेचसे चूक आहेत असं आपला आतला(:)) आवाजच सांगतो.



५. ज्या रूपासाठी सर्वात जास्त 'निकालांचा' कौल मिळेल तो शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर असे मानायला हरकत नाही. इथे - 'चुकीचे' ह्या शब्दाचे शोधनिकाल सर्वात जास्त आहेत.
ह्याच शोधपद्धतीची जरा सुधारित आवृत्ती म्हणजे आपला शब्द एखाद्या विशिष्ठ संकेतस्थळावरच शोधायचा उदा. www.esakal.com. गुगलच्या शोधचौकटीत [ चुकीचे site:www.esakal.com] असे लिहून हे करता येते.
असे करण्याचे कारण म्हणजे ह्या(व अशा वृत्तपत्रीय) संकेतस्थळांवरील लेखन इतर कुठल्याही 'पब्लिक वेबसाईट/फोरम' पेक्षा शुद्ध असते(किंवा तसे अपेक्षित आहे). तसेच ह्या संकेत स्थळांवर शोधल्याने गुगल जे हिंदी निकाल दाखवतो त्याचे प्रमाण शून्य होते. बरेच तत्सम शब्द मराठी व हिंदी भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहिले जातात.
याखेरीज गमभन चिकित्सा , शब्दकोशात शोधणे असे अनेक पर्याय आहेत. पण या सर्वांत मला हीच पद्धत सोपी वाटते. शुद्धलेखनाचे नियम लक्षात नसतील तरी हरकत नाही.
ताक : मॅटरच्या ह्या लेखावरून प्रेरित.