Friday, April 18, 2008

शुद्धलेखन तपासण्याची सोपी क्लृप्ती

मराठीत लिहायचं म्हणलं की बऱ्याच वेळा घोडं अडतं शुद्धलेखनापाशी. लेखनाच्या ह्या चुका जेवताना कचकन् दाताखाली येणाऱ्या खड्यांसारख्या लागतात. लहानपणी 'शुद्धलेखन' असा एक तेव्हा तापदायक वाटणारा प्रकार असायचा. त्याचा भयंकर तिटकारा होता. व्याकरणाच्या पुस्तकात शुद्धलेखनाचे नियम वगैरे असायचे पण ते वाचायला ठीक आहेत, लिहिताना लक्षात ठेऊन योग्य वेळेला ते वापरणे म्हणजे महाकर्मकठीण.(?)

त्यावर मी एक साधी सोपी युक्ती वापरतो. काय करायचं की -

१. आपल्याला जो लेख लिहायचा आहे तो आधी पूर्ण लिहायचा.

२. मग त्यात जे शब्द चुकीचे लिहिले गेले आहेत असं वाटत असेल ते शब्द वेगळे काढायचे.

३. मग एक एक करून गुगलवर(www.google.com) प्रत्येक शब्द शोधायचा व तो शब्द कितीवेळा गुगलला आढळला ते पहायचं उदा. वरच्या वाक्यातून 'चुकीचे' हा शब्द घेऊ.

४. मग तोच शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहून गुगलवर शोधायचा. उदा. 'चुकिचे', 'चूकिचे', 'चूकीचे', 'चुकीचे' वगैरे. यातले बरेचसे चूक आहेत असं आपला आतला(:)) आवाजच सांगतो.





५. ज्या रूपासाठी सर्वात जास्त 'निकालांचा' कौल मिळेल तो शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर असे मानायला हरकत नाही. इथे - 'चुकीचे' ह्या शब्दाचे शोधनिकाल सर्वात जास्त आहेत.

ह्याच शोधपद्धतीची जरा सुधारित आवृत्ती म्हणजे आपला शब्द एखाद्या विशिष्ठ संकेतस्थळावरच शोधायचा उदा. www.esakal.com. गुगलच्या शोधचौकटीत [ चुकीचे site:www.esakal.com] असे लिहून हे करता येते.

असे करण्याचे कारण म्हणजे ह्या(व अशा वृत्तपत्रीय) संकेतस्थळांवरील लेखन इतर कुठल्याही 'पब्लिक वेबसाईट/फोरम' पेक्षा शुद्ध असते(किंवा तसे अपेक्षित आहे). तसेच ह्या संकेत स्थळांवर शोधल्याने गुगल जे हिंदी निकाल दाखवतो त्याचे प्रमाण शून्य होते. बरेच तत्सम शब्द मराठी व हिंदी भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहिले जातात.


याखेरीज गमभन चिकित्सा , शब्दकोशात शोधणे असे अनेक पर्याय आहेत. पण या सर्वांत मला हीच पद्धत सोपी वाटते. शुद्धलेखनाचे नियम लक्षात नसतील तरी हरकत नाही.

ताक : मॅटरच्या ह्या लेखावरून प्रेरित.

3 comments:

Nandan said...

युक्ती चांगली आहे. नेहमीच्या वापरण्यातले शब्द तपासायला याची मदत होऊ शकेल. अर्थात आशिर्वाद, संयुक्तिक, पर्यावसन, दिपक अशा वारंवार होणाऱ्या चुका मात्र यातून सापडणे अवघड आहे, कारण दुर्दैवाने वृत्तपत्रातही त्या बऱ्याचदा दिसतात. मोल्सवर्थचा ऑनलाईन मराठी-इंग्रजी शब्दकोशही याबाबत उपयोगी ठरू शकेल.

Kaustubh said...

युक्ती छान आणि सोपी आहे. :)
पण नंदन म्हणतो तसा मोल्सवर्थचा शब्दकोश किंवा मराठी शाब्दबंधाचा नक्कीच चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो.

Kaustubh said...

आणि हो, या विषयावर तुलाही लिहावंसं वाटलं हे पाहून आनंद झाला. माझ्या लेखाचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद.