Tuesday, April 1, 2008

अनिता सुभाषचंद्र बोस - Anita Bose Pfaff

कोणाही थोरामोठ्यांची चरित्रे वाचताना - अमुक अमुक व तमुक तमुक यांच्या पोटी, या या ठिकाणी, ह्या ह्या वर्षी यांचा जन्म झाला वगैरे वाक्ये हटकून सापडतात. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या थोर नेत्यांची माहिती कमीजास्त प्रमाणात प्रत्येकाला असतेच. पण त्यांच्यानंतर त्यांच्या वारसांचे काय झाले, सध्या ते कुठे असतात याबद्दल फार कमी माहिती सापडते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक वादळी व्यक्तिमत्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. महान नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एकेकाळचे कॉंग्रेसचे अध्यक्ष, 'जय हिंद' चा नारा देणारे, 'आझास हिंद सेनेचे' नेतृत्व करणारे, देशासाठी अखेरपर्यंत लढत रहाणारे व एक दिवस अचानक नाहीसे होणारे नेताजी सर्वांनाच ज्ञात आहेत. पण त्यांच्या नंतरच्या पिढ्यांचे काय? किंबहुना त्यांच्या रक्ताचे कोणी सध्या अस्तित्वात आहे काय? - तर होय, आहे. त्याबद्दल ही थोडीशी माहिती.

१९३३ ते १९३६ या काळात औषधोपचारांसाठी सुभाषबाबू युरोपात होते. युरोपात असताना ते एक पुस्तकही लिहीत होते त्यासाठी त्यांना इंग्रजी व स्थानिक युरोपिअन भाषा जाणू शकणाऱ्या सहाय्यकाची गरज होती. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे असताना त्यांची ओळख एमिली (Emilie Schenkl) नावाच्या ऑस्ट्रियन युवतीशी झाली. एमिलीने त्यांची सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. कालांतराने डिसेंबर १९३७ मध्ये त्यांनी Bad Gastein या ठिकाणी एमिलीशी विवाह केला.

दरम्यानच्या काळात सुभाषाबाबू भारतात परतले. पुढे १९३८ मध्ये कॉंग्रेसचे अध्यक्षपद, राजीनामा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नजरकैद व पलायन यानंतर ते पुन्हा एकदा अफगाणिस्थान मार्गे युरोपात पोहोचले.

सुभाषबाबू व एमिली यांच्या मुलीचे नाव 'अनिता'. १९४२ साली व्हिएन्ना येथे 'अनिता बोस' यांचा जन्म झाला. अनिताच्या जन्मानंतर लगेचच १९४३ च्या सुरुवातीला जर्मन पाणबुडीतून सुभाषबाबू आशियात यायला निघाले. त्यामुळे १९४५ साली जेव्हा विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला(किंवा असे मानले जाते) तेव्हा अनिताचे वय साधारण तीन वर्षे असावे. पुढे दोन वर्षांनी फाळणीचे दु:ख सोसावे लागले. सुभाषबाबू ज्यासाठी आयुष्यभर झटले ते स्वातंत्र्य मिळाले, पण स्वतंत्र भारत पहायला मात्र ते नव्हते. अनिता मात्र त्यामुळे ऑस्ट्रियातच राहिल्या. नंतर कित्येक वर्षे लोटली. त्यांच्याबद्दल फारसं काही कधी ऐकिवात आलंच नाही. सध्या त्या 'युनिव्हर्सिटी ऑफ ऑग्सबर्ग' येथे अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्यांच्या पतीचे नाव मार्टिन प्फफ. त्यांना पीटर अरूण, थॉमस कृष्णा व माया करिना ही तीन मुले आहेत. स्वातंत्र्यानंतर १९६० मध्ये पंडित नेहरू यांच्या आग्रहाखातर त्या भारतात आल्या होत्या. त्यानंतरही किमान १०-१५ वेळा त्या भारतात येऊन गेल्या आहेत.

त्यांच्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील हे त्यांचे पान पहा.
http://www.wiwi.uni-augsburg.de/vwl/extraord/pers/apfaff.htm



No comments: