Saturday, May 5, 2007

लकी

कर्वे रोड, लकडीपुलावरुन डेक्कनवर जाण्यासाठी गरवारेंचा पिटुकला उड्डाणपूल पार केला की जेमतेम पन्नास पावलं गेल्यावर लागतं 'लकी'. जागा अशी की एका बाजूला हाँगकाँग लेन, दुसऱ्या बाजूला चँपिअन स्पोर्टस्. मागच्या बाजूला डेक्कन टॉकिज. हे इराण्याचं होटेल आपलं आवडीचं ठिकाण.

प्रशस्त दरवाजा. त्यावरच्या छज्जावर लाल अक्षरात ' L U C K Y' लिहिलेलं. आत गेलं की समोरच देव आनंदचं मोठ्ठं पोस्टर. बऱ्याच वर्षांपुर्वींच्या ह्या जुन्या पोस्टरने लकीचं देव आनंदशी असणारं नातं टिकवलेलं. काऊंटरही बहुधा त्याच काळातलं असावं. सततच्या वापराने आपोआप पॉलिश झालेल्या जुन्या लाकडाचं. त्यावर एक जाड काच - तीही त्याच काळातली, वरच्या असंख्य चऱ्यांमुळे थोडी धुसर झालेली. त्या काचेखाली अजून काही फोटो. काऊंटरच्या मागची कपाटेही जुनीच. उजव्या बाजूला 'पेशल' भाग आणि डाविकडे फुंक्यांसाठी धुम्रकांडीमुभा क्षेत्र. सगळा सेटअप कसा एकदम कंफर्टेबल करणारा.

हा काही तसा आमचा 'कट्टा' नव्हता पण बऱ्याच वेळा काही काम नसलं की साग्याला फोन लावायचा आणि इथं जाऊन बसायचं. आवडते पदार्थ बन-मस्का आणि इराणी चहा. गप्पा आणि बन-मस्का हाणायला वेळेचं बंधन नाही. चहाबरोबर कधी सामोसाही मागवायचा. बसल्या बसल्या मानस, जहाग्याला फोन लावायचे. तेही मग असतील तिथून दुचाक्या(हिला आम्ही पुण्यात 'गाडी' म्हणतो) हाकत येणार. मग अजून थोडी बकवास करायची. नाटकांचे, चित्रपटांचे, ट्रेकचे प्लॅन करायचे. भविष्याचं प्लॅनिंग करायचं. चर्चा करायच्या, वाद घालायचे. बरंच काही!

रात्रीचा नौ से बारा वाला चित्रपट संपला की आमची गाडी हटकून लकीकडे वळायची. इतक्या रात्री काय करायचं असा प्रश्न नसायचाच. घरी जायच्या आधी एकदा लकीचा चहा घेतला पाहिजेच. नंतर नंतर कधी ई-स्केअरला साडेअकराच्या शो ला गेलो तरी रात्री दिडवाजता भूक लागली की जायचो लकीलाच. रात्री बारानंतर आमच्या सारख्या गिऱ्हाईकांसाठी वेगळा प्रवेशमार्ग असायचा. लकीच्या बाजुच्या जिन्याने वर चढून पहिल्या मजल्यावरुन खाली लकीत उतरायचं. बाहेरचा दरवाजा बंद असला तरी आत आमच्यासाठी लकी चालूच असायचं.

मागच्या वर्षी हे लकी बंद झालं. डेक्कन टॉकिज आणि लकी दोन्ही जमिनदोस्त करुन त्या जागी मॉल बनवण्याचा घाट घातलाय असं ऎकलं. साठच्या दशकापासून अगदी आत्तापर्यंतच्या तरूण पिढीची हक्काची जागा गेली. कित्येक मराठी लेखकांचे, नाटककारांचे, हौशी कलाकारांचे, राजकिय कार्यकर्त्यांचे, महाविद्यालयीन विद्यार्थांचे ऋणानुबंध लकीशी जुळले असतील. आता फक्त आठवणी राहिल्या. विकासासाठी आपल्या भुतकाळाचा दिलेला हा अजुन एक बळी. पुण्यात गेल्यावर आता लकी दिसणार नाही. खंत वाटते की आठवण म्हणून ह्या लकीचा एक फोटोही कधी काढून ठेवला नाही.

3 comments:

HAREKRISHNAJI said...

ना खेद ना खंत, काळाचा ओघात या पाऊलखुणा नष्ट होताना पाहाताना

Tulip said...

chhan jhalya ahet tinhi posts. kantalwana divas jast avadala:). keep writing.

Anonymous said...

Krishnaji,

खंत आहे पण खंतावलेली पोस्ट लिहाविशी वाटली नाही :)

ट्युलिप,

थँक्स! मराठी लिहिण्यात अजून बराच टप्पा गाठायचा आहे. तुमच्यासारख्या प्रथितयश bloggers कडून तर शिकतो आहे.

Xetro