Tuesday, February 27, 2007

माझी चॅट फ्रेंड

मी तिला ओळखत नाही. तीही मला नाही. असंच भेटलो योगायोगाने. तिला मेल केली होती कामानिमित्त, पण तिने रिप्लाय दिला नाही. मग रागावून निर्वाणीचे मेल टाकलं, नकोच रिप्लाय करू म्हणून. आणि आश्चर्य, तिचा रिप्लाय आला. वा.

नावाने टिपीकल कोकणस्थ. नावंच किती सुंदर.

तिने रिप्लाय तर दिलाच पण मला मेसेंजर मध्ये ऍड हि केलं. असंच एकदा लॉगइन केलं तर तिचाच मेसेज आला. "हाय". मी हि म्हटलं "हाय". "कसा आहेस?" "मजेत". "आणि तू?"

आमच्या मैत्रीची सुरुवात झाली ती अशी.

या मुलीबद्दल तिचा आयडी सोडून काहीच माहित नाही. ना तिला कधी भेटलोय ना कधी पाहिलंय. नावावरून सुंदर असेल असं नक्की म्हणू शकतो, पण कुठलाही चेहरा डोळ्यांपुढे येत नाही. आमची मैत्री तशी फार जुनी नाही. परिपक्व तर नाहीच नाही. पण तरीही या छोट्याश्या भेटींमध्ये काही गोष्टी जाणवल्या.

हि मुलगी म्हणजे आश्चर्य आहे. तिचे लिहिणे खूप सुंदर. वागायला अगदी थेट ब्राम्हणी. हुशार देखील. पुण्यातली 'पेठी' हुशारी आणि अर्थातच लौकिकार्थाने गणली जाणारी अभ्यासू हुशारी, दोन्ही. दुसयाला आनंद देणारे तिचे स्निग्ध वागणे. खळाळता उत्साह. खरीखुरी निरागसता. निर्व्याज हसू. लोभस, लाघवी व्यक्तिमत्व. अगदी जवळच्या मैत्रीणीसारखे सगळे शेअर करणे. मोकळेपणाने प्रतिक्रिया व्यक्त करणे. चेहयावरचे भाव दाखवणाया स्माईली टाकणे. सगळंच किती मुग्ध. दुसयासाठी असणारी कळकळ, माणसे जोडण्याची प्रवृत्ती, सगळंच वेगळं.

माझी हि मैत्रीण मला संदिप खरेच्या 'मैत्रीण' कवितेची आठवण करून देते. कोणी सांगावे, त्याचीही ती मैत्रीण कदाचीत अशीच असेल!

चॅट फ्रेंड या संकल्पनेला तसा फारसा अर्थ नाही. ती मला तशी जाणवली याचे कारण तिचे मराठीत लिहिणे असेल किंवा सरळ मेसेंजर ह्या गोष्टीच्या लिमिटेशन्स असतील. तिच्यासारख्या असणारया/वागणारया मुली अनेकही असू असतील. काहीही असो, ती मला जाणवली ती अशी.

या मुलीसाठी एकच मागणे. ती अशीच आनंदी राहो. माझ्या मैत्रीणे, कदाचीत आपण कधीच भेटणार नाही. किती दिवस आपली मैत्री राहील हे ही सांगता येणार नाही. पण माझी पहिली चॅट फ्रेंड म्हणून मला तुझी आठवण कायम राहील. कधीकधी वाटतं आपले रस्ते एकमेकांना छेदून जाऊच नयेत. या छोट्याश्या जगात आपण कायमच एकमेकांपासून दुर रहावे. आहेस तिथे सुखी रहा. इथुनच तुला शुभेच्छा! आयुष्यभरासाठी!!

मी कोण? कोणी नाही.
आणि ती? ती तर पुर्णपणे अज्ञात.