Monday, January 1, 2007

एक कंटाळवाणा दिवस

हा असा सुरू होतो. सकाळी अकरा किंवा तत्सम वेळेला उठायचं. म्हणजे जाग अकरा वाजता येणार, त्यानंतर उगाचंच लोळत रहायचं. विचार करायचा आज काय काय करायचंय त्याचा. फक्त विचारच करायचा. मग थोड्या वेळाने उठू म्हणून कूस बदलून पडून रहायचं. बाजूला घड्याळ किंवा मोबाईल असतोच. अजून जमतील तशी अर्धवट राहिलेली स्वप्ने बघत रहावी. असं पडून पडून कंटाळा आला कि मग वेळ बघायची. साडेअकराच झालेत ना मग वेळ आहे अजून. तसंही काय करायचं आहे आज, काहीच नाही. मग पंधरा मिनिटांनी स्वतःलाच उठावंसं वाटतं. मग उठावे. आळस द्यायचं कारण नसतंच पण द्यावा. आत्ता पावणेबारावाजता फार मजा वाटत नाही त्यात पण आपली सवय.

आता काय करायचं? बेडरूम मधून बाहेर येऊन बघावे. आपला फ्लॅटमेट काहीतरी करत असतो. त्याला जरा लवकर उठल्याबद्दल शिव्या घालाव्यात. एक जांभई द्यावी आणी TV चालू करावा. हा डब्बा बघण्यासाठीच बनवलेला असतो. दोन चार चॅनेल बदलावे. ह्या विचित्र वेळेला तसंही काही चालू नसतं, मग जरा टिव्हीवाल्यांना नावे ठेवावीत. टिव्हीवाल्यांना म्हणजे चॅनेलवाल्यांना. टिव्ही बंद करून परत विचार करावा काय करावं त्याचा. मित्राला विचारावं आपली क्रिकेटची मॅच कधी आहे ते. ती नेमकी आज नसतेच. असूनही काय उपयोग म्हणा, आपल्याकडे दिसणार नाहीच. नाईलाजाने दात घासावेत. दात घासताना विस्कटलेले केस नीट करावेत. नंतर दाढी करावी का याचा विचार करावा. हा विचार बराच वेळ करून निर्णय घ्यावा - नाही. आपल्याला ना कोणी गर्लफ्रेंड आहे ना आपल्याकडे कोणी पहाणार. उगाच कशाला त्रास. तशीही थोडी वाढलेली दाढीच आपल्याला चांगली दिसते. चला एक काम वाचलं. मित्र स्वतः चहा पिऊन बसलेला असतो, आणी आपला चहा बनवलेला नसतो. आता चहा करायचा तर ते चहाचे भांडं तर घासलं पाहिजे. अरेरे! चिडचीड होते पण करायला लागतं बाबा. आपलं लग्न थोडंच झालंय. करा काम स्वतःच.

आता जरा स्थिरस्थावर होऊन सिरियस व्हावं आयुष्याबद्दल. आपला देश किती चांगला असं पुन्हा एकदा म्हणावं. मेल तरी चेक करू म्हणून लॅपटॉप चालू करावा. जी काय फॉरवर्डस आलेली असतात ती बघावी. त्यात एखादी मेल अशी असते कि त्यात गुलाबाची फुले, कुत्र्याची पिल्ले, मांजराची पिल्ले असले प्रकार असतात. हे एक आपल्याला जाम आवडत नाही, पोरी म्हणजे जाम येड्या असतात. कुत्री, मांजरी त्यांना चांगली वाटतात. परत एकदा वाईट वाटतं. जाऊदे. मेसेंजरवर बघावं लॉगईन करून, आधी इनव्हिजीबल मोड मध्ये लॉगीन करावं. नेमके नको असलेले लोक ऑनलाईन असतात. त्यांच्याशी आपल्याला बोलण्यात इंटरेस्ट नसतो. मग काही मित्रांना ऑफलाईनर्स टाकावेत. शिव्या घालून, मेल का करत नाही. कॉन्टॅक्ट का ठेवत नाही. इतका माज का, वगैरे रुटिन प्रश्ण विचारावेत. एक दोन मुली असतील तर एकदम शहाण्या आणी सज्जन मुलासारखे त्यांनाही मेसेजेस टाकावेत. काय करणार इमेज सांभाळावी लागते.

आता जेवणाची वेळ झालेली असते. घरी जेवण बनवण्याची तर जाम इच्छा नसते. बाहेर कुठे खाणार? त्या वेस्टफिल्डमधे सगळी फास्टफुडची जॉईंटस आहेत. पण थाई, जॅपनीज, मलेशियन, टर्की, मेक्सिकन सगळं खाऊन कंटाळा आलेला असतो. मॅक-डी, सबवे, उपाशी जॅक (हंग्री जॅक), पिझ्झा हट, ऑपर्टो सगळं बकवास असंतं. इंडियन फूड वाला काही धड बनवत नाही त्यामुळे तेही नको असतं. परत आहेच प्रश्ण काय खावं याचा. जिसका कोई नही उसका मॅगी होता है. पण मग विचार करावा आठवड्याची खरेदी पण करायची आहे, बिस्कीटेही नाहियेत घरी. जायलाच पाहिजे. ठिक आहे, दुखीः मनाने का होईना आपण जाण्याचा निर्णय घेतो पण अजून एक यक्षप्रश्ण असतोच - अंघोळ. पुन्हा एकदा चिडचिड होते. एकतर थंडी असते त्यातून अंघोळ करायची म्हणजे. हा विचार अजून एक काम आठवून देतो, कपडे धुवायचेत. चायला काय कटकट आहे. वॉशिंगमशीन चालवणे काय सोपे काम असते का.

बाहेर पडावं तर आकाश ढगाळलेलं असतं. त्यातून थंडी. हा चिल फॅक्टर का काय म्हणतात तो काम करत असतो. रस्त्यावर तुरळक गर्दी असते. आपल्याकडे काय कार नसते, म्हणून मग चालू लागावं फुटपाथवरून. नशिब पाऊसतरी पडत नाहिये. तिकडे पोचल्यावर काय खायचं याचा निर्णय घ्यायचा असतो. वेगवेगळ्या दुकानातली पदार्थाची नावे वाचावीत. आपल्याला एकही नाव कळत नसतं. आता इतके दिवस रहातोय म्हणून काही पदार्थ ओळखीचे असतात इतकंच. प्रत्येकात बीफ, बेकन, लॅम्ब, पोर्क, चिकन काय काय असतं. मग जाणवतं कि पोट सुटायला लागलंय. पॅन्ट घट्ट होतीये. नॉनव्हेज नकोच. आज काही सण बिण आहे का ते माहित नाहिये पण असला तर! असं म्हणून व्हेज राईस विथ एक्स्ट्रा चिली घ्यावा जपान्याकडून. हे लोक एकतर तिखट खात नाहित, आपल्याला तिखट आवडतं. कशाला अन्नाला नावे ठेवा असं म्हणून खाऊन टाकावा. पाण्याच्या ऎवजी सॉफ्टड्रिंक प्यावं. जेवणानंतर हात धुणे हा प्रकारही नसतो मग ते कागदाला पुसावेत. पेपर नॅपकिन हो.

इकडेतिकडे फिरावं. सौंदर्य बरंच असतं आजूबाजूला. ऍप्रिशिएट करावं. दुकानात शिरून कपडे बघावेत. आवडले नाहीत म्हणून घेऊ नयेत. जरा खरेदी करून परत येईपर्यंत चार-साडेचार झालेले असतात. पुन्हा प्रश्ण असतोच काय करावं त्याचा. टिव्ही चालू करून उपयोग नाही हे माहीत असतं. घरी फोन केला पाहिजे का? नको. मागच्या रविवारी तर केला आहे. चला जरा एखादा हिंदी पिक्चर घेऊन येऊ. सिटी कॉन्सिलच्या लायब्ररिच्या डिव्हीड्या परत करायच्यात, उद्या दिल्या पाहिजेत. नविन पिक्चरची डिव्हीडी काही मिळत नाही, मग जी मिळेल ती घेऊन यावी. मित्राला म्हणावं कॉफी कर. यावर जरा एक प्रेमळ संवाद होतो, मागच्यावेळेला कोणी केली होती, आता कोणी केली पाहिजे यावर डिस्कशन होतं. एक विचार - जाऊदे कशाला कॉफी बिफी असाही येतो. पण आत्ता पर्यंत मित्राला कॉफिची गरज पटल्याने आपल्याला झक मारत करायला लागते. हेही एक मोठ्ठं काम वाटतं मग.

पिक्चर पण बकवास असतो. काय बघण्यात अर्थ नाही. मग परत मांडी संगणक चालू करावा. देशातल्या लोकांना रविवारी महत्वाची कामे असल्याने त्यांनी मेल केलेले नसतात. परत चिडचिड. मग ऑर्कूट उघडून पक्षीनिरिक्षण करावे. एक दोघांच्या वहीत भंकस करावी. कोणीतरी येईल अश्या आशेने ऑनलाईनच रहावं मेसेंजरवर. कोणी आलाच ऑनलाईन तर त्याला पिडावं.

आता संध्याकाळ संपून रात्र होत आल्याने मित्र नाईलाज म्हणून जेवण बनवायला जातो. उद्या डबा न्यायला पाहिजे ना, मग आज बनवायलाच पाहिजे जेवण. आपण जरा टिव्ही जरा पिक्चर जरा एखादं पुस्तक जरा देशातली बातमी बघत टाईमपास करावा. जेवताना तीच ती लेबानीज रोटी जास्तच नको वाटते.

आता रात्री मात्र आपण काहीच केलं नाही आज असं वाटायला लागतं. उद्या कंपनीत काय काय काम पडलंय ते आठवतं. कपडे इस्त्री केले आहेत का ते बघतो आपण. पुढचा विकएन्ड वाया घालवायचा नाही असं ठरवून आपण झोपी जातो. काय करणार उद्या लवकर उठायचं असतं!

Originally Written on April 25, 2006

2 comments:

Meghana Bhuskute said...

universal weekend!
lolane ani nantar tyabaddla pastawane!
mast...

Nandan said...

zakas. gharoghari matichyach chuli asa vachatana satat vatat hota :)