Tuesday, November 6, 2007

तुतारी

परवा आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-ट्वेंटी चा सामना जिंकलो. तो ही मुंबईत, महाराष्ट्राच्या खुद्द राजधानीत, क्रिकेटच्या पंढरीत. मग सुरू झाला जल्लोष. सगळीकडे उत्साहाला उधाण, क्रिकेटपटूंचं कौतुक वगैरे. पण या सगळ्यात महाराष्ट्र टाइम्स मध्ये आलेली एक बातमी कदाचित आपल्या नजरेतून निसटली.

डीजेच्या गोंगाटात दबला तुतारीचा आवाज

आणि खरोखर त्या आनंदातही वाईट वाटलं. चिडचिड झाली. तुतारीच्या अनास्थेबद्दल आणि तुतारी वादकाला मिळालेल्या वागणुकीबद्दल. वीरश्री चेतवणारा तुतारीचा तो आवाज मनात घुमला. वानखेडेवर हजारो लोकांच्या समोर आपल्या देशासाठी, क्रिकेट टीम साठी तुतारी वाजवण्याआधी त्या तुतारीवादकाचे मन अभिमानाने भरून आले असेल. सारी शक्ती पणाला लावून, जिवाच्या आर्ततेने फुंकून त्याने तुतारी वाजवली आणि कोणाला त्याचं ना कौतुक ना अप्रुप.

माझ्या महाराष्ट्राचीच सध्या अशी अवस्था आहे का? आमचा दगडधोंड्यांचा महाराष्ट्र, आमची रांगडी मराठमोळी संस्कृती, आमच्या लोककला, आमचे महाराज, आमचे गड, किल्ले सगळंच विस्मृतीत जातंय का? आमचा पारंपारीक वारसा पुढे पोचवू न शकण्याइतकी आमची पिढी करंटी निघू नये. वाढवता नाही आलं तर कमीतकमी आम्ही जुनं जपलं तरी पाहिजेच.